मार्च मधे नविन भारतीय सौर वर्ष सुरू होते. या भारतीय-राष्ट्रीय पद्धतीविषयी प्रचंड अनास्था आहे, कित्येकांना असे काही असते हे देखील माहिती नाही. यासंदर्भात फार दिवसांपूर्वी http://guruvision.in/downloads/solarsrc.zip ही स्क्रिप्ट लिहिली होती. मराठी-मंडळींना विनंती यासंदर्भातले ब्लॉग-विजेट केल्यास आणि ते वापरले गेल्यास या मागे पडत चाललेल्या पद्धतीचे पुन्र्ज्जीवन होईल. सध्या ज्ञानप्राबोधीनी शिवाय कोणीही अशी दिनदर्शिका प्रकाशित करत नाही.
--
राष्ट्रीय कालगणना कशासाठी ?
सौर म्हणजे सूर्यावर आधारीत. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर संबंधावर ही कालगणना असल्यामुळे चांद्र कालगणनेपेक्षा सौर कालगणना ही निसर्गचक्राला अधिक जवळची आहे.
भारतामध्ये अनेक सण आणि धार्मिक कृत्ये चांद्रतिथिवर आधारित आहेत हे ख़रे तथापि निसर्गचक्राशी जवळ्चा संबंध असणारी ही कालगणना शास्त्रीय दृष्ट्या अधिक महत्वाची आहे.
ग्रेगेरीयन कालगणना (इंग्रजी किंवा ख़्रिस्ती कालग्णना) ही सुध्दा सौर कालगणना असली तरी त्यातील वर्षारंभ १ जानेवारीला येतो पण त्या दिवशी अवकाशात कोणतीही विशेष घटना घडत नसते.राष्ट्रीय सौर दिनदर्शिका मात्र ख़गोलीय घटनांशी निगडीत आहे, त्याचा तपशील ख़ालिलप्रमाणे-
भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेनुसार वर्षाचा आरंभ सौर दिनांक १ चैत्र (२१मार्च ) या दिवशी असतो.(चैत्र,वैशाख़ इ. महिन्यांची भारतीय नावे चांद्र आणि सौर या दोन्ही कालगणनांमध्ये आहेत.)त्यालाच ‘वसंतसंपातदिन’ असेही म्हणतात.या दिवशी सूर्य विषुवृत्ताच्या उत्तरेकडे जाऊ लागतो.सौर दिनांक १ आषाढ (२२ जून) तो उत्तरतम अंतरावर येतो.त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन (सुर्याची दक्षिणेकडे वाटचाल) सुरू होते.सौर दिनांक १ आश्विन (२३ सप्टें.) रोजी सुर्य विषुवृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो आणि सौर दिनांक १ पौष (२२ डिसें.)या दिवशी तो दक्षिणतम अंतरावर येऊन नंतर पुन्हा त्याची उत्तरेकडे वाटचाल (उत्तरायण) सुरु होते.
पृथ्वीवरून दिसणारी सूर्याची ही भासमान वाटचाल हे एक सतत चालु असणारे निसर्गचक्र असल्यामुळे याच्याशी निगडीत अशी भारतीय सौर कालगणना ही ग्रेगेरीयन या सौर कालगणनेपेक्षा अधिक शास्त्रिय आहे.
‘भासमान वाटचाल’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे आपल्याला पृथ्वी स्थिर असुन सुर्य उगवतो,मावळतो असे जे वाटते तो भास असुन वास्तविक पृथ्वी स्वत्:भोवती पश्चिमकडून पूर्वेकडे फ़िरत फ़िरत सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा घालते. त्यामुळे त्या त्या राशींमध्ये सुर्य येत नसतो तर पृथ्वी येत असते. तथापी सुर्य उगवतो,मावळतो तसेच विविध राशींमधून फ़िरतो असे वाटते.
सुर्याचा प्रत्येक राशीतील कालावधी पाहुन त्यानुसार या सौर् कालगणनेत महिन्याचे ३० अथवा ३१ दिवस निश्चित केले आहेत. त्या दृष्टिने रास आणि सौर् मास हे पुढिल प्रमाणे जुळतात – मेष -चैत्र,वृषभ- वैशाख, मिथुन-ज्येष्ठ, कर्क-आषाढ, सिंह-श्रावण, कन्या-भाद्रपद, तूळ-आश्विन,वृश्चिक-कार्तिक,धनू-अग्रहायण,मकर-पौष,कुंभ-माघ, मीन-फ़ाल्गुन.
वास्तविक सूर्याचा मकर राशीत प्रवेश २२ डिसेंबर रोजी होतो त्यामुळे मकर-संक्रांत ही नैसर्गिक घटना दरवर्षी २२ डिसेंबर रोजी होते.पण भारतातील अनेक सण आणि धार्मिक कृत्ये चांद्रतिथीवर होत असल्यामुळे साधारणपणे जानेवारीमधील कोणत्यातरी दिवशी तिथीनुसार मकर-संक्रांत येते.
चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा सुमारे १०-११ दिवसांनी कमी असते त्यामुळे चांद्र आणि सौर कालगणनेतील फ़रक भरून काधण्यासाठी दर ३ वर्षांनी एक अधिक मास घ्यावा लागतो.म्हणजे चांद्र कालगणना सुध्दा सौर कालगणनेशी स्वत:ला जुळवून घेते.
खगोलीय घटनांवर ही कालगणना आधारीत असल्यामुळे जागतिक स्तरावर वापरण्यासाठी ही सर्वाधिक योग्य कालगणना आहे.
सौजन्य: ज्ञानप्रबोधिनी,पुणे.
मराठी विज्ञान परिषद, ठाणे.